चिपळूण न.प. प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

चिपळूण : शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व चाळण लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाकडून पाऊस गेल्याचे संकेत मिळाल्याने रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी केवळ दगड-माती टाकण्यात आली होती. आता रस्ते दुरुस्ती अंतर्गत खड्यांवर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन वर्षांत रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत व वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात्त खड्यांची संख्या वाढली. सुमारे अडीच वर्षे न.प.मध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. नगरसेवक नसल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत केवळ नागरिकांचा संताप व्यक्त होत होता. दरम्यान, पावसाळी हंगामात रस्त्यांची चाळण होऊन खड्यांची संख्या आणि खोली वाढू लागली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांसह वारंवार वाहतूक कोंडीचे प्रकार घडू लागले.

पावसामध्ये खड्डे भरण्यासाठी प्रशासनाकडून दगड-मातीचा वापर करण्यात आला. मात्र, हा उपाय तात्पुरता ठरला. त्यामुळे खड्डयातील दगड-मातीमुळे निर्माण होणारा धुरळा शहरभर पसरत होता. दिवाळी झाल्यानंतर प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यासह वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे डांबरीकरण करून भरण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळा गेल्यामुळे डांबरीकरणाने भरलेले खड्डे आता सुस्थितीत राहतील आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुकीनंतर संपूर्ण शहरातील रस्ते नव्याने करण्यासाठी सुमारे तीन ते चार कोटी रूपये खर्चाचे नियोजन झाले असून, लवकरच हे कामदेखील हाती घेतले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 06/Nov/2024