चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा नारळ आज देवरूखमध्ये फुटणार

देवरूख : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रचाराचा नारळ आज (६ नोव्हेंबर) देवरूखमध्ये फुटणार असून महाविकास आघाडीचा भव्य मेळावा देवरूख शहरातील मराठा भवन सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

या मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम विरूद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यात थेट सामना होणार आहे. प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी आज देवरूखमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, मेळाव्याद्वारे प्रशांत यादव यांच्या प्रचाराची तुतारी फुंकली जाणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

या मेळाव्याला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरूख शहराध्यक्ष नीलेश भुवड, महिला नेत्या डॉ. नलिनी भुवड, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, महिला नेत्या नेहा माने, वेदा फडके, प्रद्युम्न माने, मुन्ना थरवळ, छोट्या गवाणकर आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 06/Nov/2024