“ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन”; पंतप्रधान मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे.

अटीतटीची डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी घेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली.

डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत ट्रम्प यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. “ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं हार्दिक अभिनंदन. आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता, समृद्धीसाठी एकत्र काम करू या” असं मोदींनी म्हटलं आहे.

“ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यश पुढे नेत आहात, मी भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या सहकार्याने नवीन गोष्टी करण्यास उत्सुक आहे. आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता, समृद्धी वाढवण्यासाठी एकत्र काम करू या” असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 06-11-2024