रत्नागिरीत रवींद्र चव्हाण घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीकरिता भाजपला एकही जागा मिळाली नसली, तरी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येण्याकरिता भाजपची मदत लागणार आहे. त्यामुळेच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता भाजप नेते आणि राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. ते सर्वच विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका येणार आहेत.

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीवेळी कोकणातील सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या होत्या. यामुळेच विधानसभा निवडणूकीचा जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. विधानसभेच्या जागा महायुतीला म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्या, भाजपा कार्यकर्त्यांना जिल्ह्यात गुहागर व रत्नागिरीची जागा मिळावी, अशी अपेक्षा होती; परंतु एकही जागा न मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे; परंतु मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळे कोणाही कार्यकर्ता, पदाधिकारी समाजमाध्यमांतून विरोधामध्ये व्यक्त झाला नाही.

आता रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात कोणत्या टीप्स देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चव्हाण आज (ता. ६) सकाळी ११ वा. दापोली-खेड-मंडणगड विधानसभेची बैठक भोजने माटे सभागृहात घेणार आहेत. दुपारी १२.३० वा. त्याच ठिकाणी गुहागर विधानसभेची बैठक होईल. ३ वा. याच सभागृहात चिपळूण विधानसभेची बैठक होईल, तर रत्नागिरी विधानसभेची बैठक साय. ६ वा. माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात होणार आहे. रात्री ९ वा. हे हॉटेल मथुरा येथे मुक्काम आहे, तर ७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून ते शहरातील प्रमुख मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 06/Nov/2024