राधाकृष्णनगरमधील गटारातील ती टाकी अखेर चिपळूण पालिकेने काढली

चिपळूण : शहरातील राधाकृष्णनगरमध्ये गटारातच ठेवलेली शौचालयाची गळकी टाकी अखेर पालिकेने काढली आहे. पालिका प्रशासन व बांधकाम व्यावसायिक यांच्यात असलेल्या जमीनमालकीच्या वादातून व्यावसायिकाने ही टाकी ठेवली होती. लवकरच जागेच्या मालकीबाबत पालिका आणि संबंधित व्यावसायिकाची बैठक होणार आहे.

राधाकृष्णनगरमध्ये असलेल्या गटारात काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाने शौचालयाची गळकी टाकी ठेवली होती. गटारातून सांडपाणी वाहत नसल्याने रोगराईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पालिकेत तक्रार केली. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाशी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असताना, गतवर्षी झालेल्या प्रकारानंतर तत्कालीन नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय मोजणी करून घेतलो.

त्यानुसार ही जागा आपली असल्याचे स्पष्ट झाले. गटाराची जागा आपल्या मालकीत आल्याने ही टाकी ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार बुधवारी चर्चा होणार होती; मात्र ती काही कारणास्तव न झाल्याने पालिका प्रशासनाने तूर्तास ही टाकी काढून टाकली आहे. काही दिवसांत संबधित व्यावसायिक, पालिका प्रशासन यांच्यात बैठक होणार असून, त्यात जागेच्या मालकीबाबत चर्चा होणार आहे. सध्या टाकी काढून टाकण्यात आल्याने सांडपाण्याची समस्या निकाली निघाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 06/Nov/2024