दापोली : दिवाळीच्या सुट्ट्या पडताच पर्यटकांची गर्दी वाढली आहे. काही पर्यटक हे वनडे टूरसाठीही येतात. दापोलीच्या किनारपट्टीवर २ तारखेपासून २.५० ते ३ लाख पर्यटक येऊन गेले आहेत आणि या आणखी वाढ होईल असे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणाहून कोकणामध्ये पर्यटक दाखल होत आहेत. कोकणातील रिसॉर्टमध्ये गेले दोन महिन्यांपूर्वीपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले होते. पुढच्या येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे. अनेकांनी तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले होते. नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखवण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्यावेळी याचे आयोजन करण्यात येत आहे. येथील निसर्ग अनुभवायचा असतो आणि म्हणून न चुकता ही कुटुंबे येथोल शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉब्लिकन सफारी, वॉटरस्पोर्ट्स यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिकांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरूड, काशीद, हरिहरेश्वर आणि रत्नागिरीत गणपतीपुळे, गुहागर दापोली तर सिंधुदुर्गात मालवण कुडाळ, निवती, आचरा, तारकर्ली, सावंतवाडी, आंबोली या ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते.
तपासणीचा त्रास
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पर्यटकांना पोलिसांच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे. पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येताना किमान नऊ ते दहा ठिकाणी बंदोबस्तामुळे सर्व साहित्याची तपासणी केली जाते. त्यामुळे रनिंग पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातदेखील अशाच प्रकारे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता.
दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम हा खरा तर किमान १५ दिवस तरी चालतो. या वेळेस पर्यटक भरपूर प्रमाणात आले होते. अगदी सर्व किनारपट्टी फुल्ल आहे. परंतु हे फक्त अजून चार दिवस चालेल. कारण, याच महिन्यात असलेल्या निवडणुकांमुळे इथे येईपर्यंत किमान नऊ ते दहा वेळा तरी पोलिस चेकिंग होते. त्याला पर्यटक कंटाळतात. – प्रबोध जोशी, हॉटेल व्यावसायिक, मुरूड
दोन नोव्हेंबरपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. सध्या सर्व फॅमिली पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे. येत्या २० तारखेनंतर डिसेंबर महिन्याची बुकिंग सुरू होईल. गेल्या तीन दिवसांत दोन ते तीन लाख पर्यटक येऊन गेले आहेत, अजून येत आहेत. नीलेश मुकादम, व्यावसायिक, मुरूड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 06/Nov/2024














