‘ऑलिम्पिक २०३६’च्या आयोजनास भारत सज्ज, आयओसीकडे सोपविले आशय पत्र

नवी दिल्ली – भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) १ ऑक्टोबरलाच आयओसीला पत्र दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सर्वप्रथम २०३६ साली ऑलिम्पिक यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षी आयओसीची निवडणूक पार पडणार असून, त्याआधी ऑलिम्पिक यजमानपदाचा निर्णय घेतला जाणार नाही. २०३६ सालच्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारतासह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तान यांचाही समावेश आहे. भारताने आशय पत्र दिल्याने आता यजमान निवडण्याच्या प्रक्रियेत भारत अनौपचारिक संवादापासून निरंतर संवादाच्या सत्रात पोहचला आहे. यामध्ये संभाव्य यजमानांसह आयओसीच्या वतीने विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन होते.

विशेष म्हणजे, भारताच्या यजमानपदाला आयओसीचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक यांचाही पाठिंबा आहे. भारताने याआधी २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली होती. परंतु, ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन अहमदाबादमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी जर भारताला यजमानपद मिळाले, तर या ऑलिम्पिक पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये योग, खो-खो आणि कबड्डी या देशी खेळांचा समावेश करण्याबाबत भारताकडून जोरदार प्रयत्न होतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 06-11-2024