रत्नागिरी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ १५६ शाळांची दुरुस्ती

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या १५६ प्राथमिक शाळांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.

त्यातील बहुतांशी शाळा नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन आणि सेस फंडातून १ कोटी ३० लाख ४१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या शाळांची दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा नादुरुस्त आहेत. त्यामध्ये काही शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत. काही शाळांचे छप्पर मोडकळीस आले आहे. खिडक्या, दरवाजे नादुरुस्त झाले आहेत. अशा शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती; मात्र, पुरेसा निधी नसल्याने ठराविक शाळांचीच दुरुस्ती केली जात होती. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार केंद्रांवर ग्रामपंचायतीचे अधिनस्त असणाऱ्या शाळांमध्ये २० नोव्हेंबरला मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मतदार केंद्र असल्याने ही मतदार केंद्र सुस्थितीत असणे आवश्यक आहे. याकरिता या मतदान केंद्राची आवश्यक देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या १५६ प्राथमिक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने या शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेची धावपळ सुरू झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांच्या पथ्थ्यावर पडत आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा नादुरुस्त असून, निधी नसल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत; मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नादुरुस्त शाळांसाठी दुरुस्ती करण्यात येत आहे.

दुरुस्तीच्या शाळा
तालुका शाळा
मंडणगड २
दापोली १९
खेड ५९
चिपळूण १९
गुहागर ८
संगमेश्वर १६
रत्नागिरी ९
लांजा ६
राजापूर १८

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 06/Nov/2024