महायुतीमध्ये मतभेद नाहीत : मंत्री रवींद्र चव्हाण

चिपळूण : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुठेही मतभेद नाहीत. गुहागर, दापोली आणि रत्नागिरीदेखील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने तेथील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. दापोली मतदारसंघात वाद नव्हताच, तो एक गैरसमज आहे. रत्नागिरीतील बाळ मानेंनी विचारांशी गद्दारी केली असून, राज्यात महायुतीच्या 200 हून अधिक जागा जिंकून येतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कापसाळ येथील माटे सभागृहात दापोली, गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी दापोलीतील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम, गुहागर मधील राजेश बेंडल उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत.

दापोली तसेच गुहागरमध्ये महायुतीत कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असून, कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार डॉ. विनय नातू हे देखील प्रचारात सक्रिय राहिले आहेत. रत्नागिरीत बाळ मानेंनी भाजपाला राम राम केला असला तरी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते महायुती सोबत राहिले आहेत. माने यांनी शिवसेना उबाठात प्रवेश करून विचारांशी गद्दारी केलेली आहे. त्यांना भाजपाची कदापी साथ मिळणार नाही. रिफायनरीचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल.(Maharashtra assembly poll)

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, बारसू येथील संपादित 5 हजार एकर जागेत रिफायनरी येण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रयत्न केले होते. आता तेच रिफायनरी होऊ नये यासाठी विरोध करीत आहेत. एकीकडे राजापुरातील स्थानिक आमदार रिफायनरीला समर्थन देतात, तर दुसरीकडे उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करतात, यात आमची भूमिका स्पष्ट आहे, जनतेचा विरोध स्वीकारून प्रकल्प लादला जाणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 07-11-2024