रत्नागिरी : मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसुमध्ये व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र दिले. आता तेच उद्धव ठाकरे हे मी बारसू रिफायनरी रद्द करणार, अशी भूमिका घेत आहेत. विद्यमान उमेदवार रिफायनरीचे समर्थन करतात, तर माजी खासदार विरोध करतात, अशी यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. उद्धव ठाकरे यांची झालेली रत्नागिरीतील सभा म्हणजे कॉर्नर सभा होती, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या मंगळवारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ना. सामंत म्हणाले की, ज्यावेळी मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलो तेव्हा माझी स्तुती केली, नंतर मी मंत्री झालो तेव्हा मी चांगला होतो; पण शिंदे साहेबांसोबत गेल्यावर मी वाईट झालो. आता आम्ही दोन भाऊ आमदार होतोय याचे त्यांना दुःख होतेय, असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. उद्धव ठाकरे यांची झालेली ही सभा म्हणजे कॉर्नर सभा होती, अशी टीकाही त्यांनी व्हीडीओ व्हायरल करुन केली. मतदान आल्यानंतर पक्षाची भूमिका कशी बदलू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘उबाठा’ असल्याचे ते म्हणाले.
माझ्यावर अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर घाणेरड्या भाषेत बदनामीकारक बोलणे, तेही एका पक्षाच्या प्रमुखाने बोलणे हे मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच बघतोय. त्यांनी टीका केली, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना, स्वतः मुख्यमंत्री असताना तुमचे चिरंजीव पर्यावरणमंत्री होते हे लक्षात ठेवले पाहिजे, असा टोलाही ना. सामंत यांनी ठाकरे यांना लगावला.
जो नेता, जी व्यक्ती माझ्यावर टोकाची टीका करतो, त्याच दिवशी माझी 10 ते 15 हजार मते वाढलेली असतात. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराच्या प्रचाराला आलेल्या उद्धव ठाकरेंना मनापासून धन्यवाद देतो असे सांगतानाच, भावी पिढीला महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी सांगितल्या असत्या तर चारपाच हजार मते वाढायला मदत झाली असती, पण शेवटी ही दुर्बुद्धी असते. आम्ही सर्वसामान्यातून मोठे झाल्याने काही लोकांना पोटशूळ असल्याचेही ना. सामंत यांनी बोलून दाखवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 07-11-2024














