रत्नागिरी जिल्ह्यात २१ लाख ५५ हजारांची रोकड जप्त

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी विद्यानसभा मतदार संघातील स्थिर सर्वेक्षण पथकांनी गेल्या १४ दिवसांत केलेल्या कारवाईत २१ लाख ५५ हजार ७२० रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ही रक्कम जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडे जमा करण्यात आली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करत आहे.

प्रचाराला सुरुवात झाल्याने आता पथके अधिक सक्रिय झाली असून, मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार घडू नये, पैशाचा गैरवापर केला जाऊ नये तसेच मतदारांना उमेदवारांकडून प्रलोभन दाखवण्यात येऊ नये यासाठी या मतदार संघात सहा स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. यामध्ये हातखंबा, वाटद, भाट्ये, गावखडी, करबुडे आणि उक्षी या सहा पथकांचा समावेश आहे.

यापैकी हातखंबा, वाटद, भाट्ये, गावखडी या चार पथकांनी २२ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांच्या केलल्या तपासणीत १५ कारवाया करून २१ लाख ५५ हजार ७२० एवढी रोख रक्कम जप्त करून जिल्हा खर्च संनियंत्रण समितीकडे सुपूर्द केली आहे. गेल्या १४ दिवसांत पाच मतदार संघातील सर्वाधिक कारवाया असून, सर्वाधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 07-11-2024