Joe Biden praises Kamala Harris, US Election: अमेरिकेच्या जनतेने बुधवारी नव्या राष्ट्राध्यक्षाची निवड केली. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी २७७ इलेक्टोरल मते मिळवून विजय साकारला.
त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या २२४ इलेक्टोरल मते मिळवणाऱ्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प यांना एकूण ५१% ( ७ कोटी १३ लाख ३८ हजार ४२९) मते मिळाली तर कमला हॅरिस यांना ४७.४% ( ६ कोटी ६२ लाख ६९ हजार ३४६) मतांवर समाधान मानावे लागले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना निवडणुकीत पराभूत केल्यानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
“आज अमेरिकेने ज्या कमला हॅरिस यांना पाहिले, त्यांना मी खूप आधीपासून ओळखतो. त्या अतिशय परिपक्व आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो. त्या एक उत्तम सहकारी, एक प्रामाणिक आणि धाडसी लोकसेवक आहेत. हॅरिस यांनी एक ऐतिहासिक मोहीम राबविण्यासाठी असाधारण परिस्थितीत पाऊल टाकले. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर प्रचार केला. अमेरिकन लोकांसाठी अधिक मुक्त, न्याय्य आणि राष्ट्रासाठी स्पष्ट दृष्टी देणारे व्हिजन त्यांनी दिले होते. कमला यांना निवडण्याचा निर्णय माझा होता याचा मला आनंद आहे,” अशा शब्दांत जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांची स्तुती केली.
पुढे कौतुक करताना बायडेन म्हणाले, “अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेच्या स्टोरीप्रमाणेच कमला हॅरिस यांचाही जीवनसंघर्ष आहे. सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व त्या करतात. त्या आमचा लढा पुढे सुरुच ठेवतील यात वाद नाही. अमेरिकन जनतेसाठी त्या चॅम्पियन आहेत आणि कायमच राहतील.”
ट्रम्प यांचेही केले अभिनंदन
ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून एका एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आणि व्हाईट हाऊसला बोलवण्यासाठी संपर्क साधला होता. सध्याचे प्रशासन आणि येणारे प्रशासन यांच्यातील हृद्य संबंध निर्माण करण्यात मदत करण्यासाठी त्यांना संवाद साधला होता. नव्याने अस्तित्वात येणारे सरकार योग्य पद्धतीने आणि सुरळीतपणे चालवण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांना आमंत्रित केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 07-11-2024