रत्नागिरी : एनएसएस शिबिरात चांगले सशक्त, संस्कारित नागरिक घडविण्याची यशस्वी परंपरा असून, आनंददायी शिबिरातून भविष्यासाठी चांगले सहकारी मिळतात व एनएसएसचे कुटुंब तयार होते, असे प्रतिपादन आर. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विशेष शिबिराचे आयोजन कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर, कुर्धे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शिक्षण सुधारक समितीचे कार्यवाह आनंद मराठे, ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीचे प्रशासक नरेंद्र पन्हाते, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. स्नेहा बाणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने व दीपप्रज्वलनाने झाली. या निवासी शिबिरांतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, भात कापणीचा अनुभव, गणेशगुळे गणपती मंदिर परिसर व शाळा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ, चर्चासत्रे, स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. आभार प्रा. अभिजित भिडे यांनी मानले. या शिबिराचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 07/Nov/2024














