रत्नागिरी : राज्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आता अधिक अद्ययावत करण्यात येणार आहे. मार्च २०२५ पासून नव्या स्वरूपात येणारी ‘१०८ रुग्णवाहिका’ मोबाईल अॅपवरही उपलब्ध असेल. या अॅपवरून रुग्णवाहिका कुठपर्यंत आली याची ये माहिती सहज उपलब्ध होईल. रुग्णाला वैद्यकीय आणीबाणी प्रसंगी रुग्णालयात नेण्यासाठी र राज्यभरात १०८ रुग्णवाहिका फार मोलाची भूमिका बजावत आहे. मात्र बऱ्याचदा १०८ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर ती नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तिला पोहोचायला किती वेळ लागेल हे समजत नसल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णवाहिकेची वाट न पाहता मिळेल. त्या वाहनाने रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेत १०८ रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हावी यासाठी मार्च २०२५ पासून मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एखाद्या व्यक्तीला रस्त्याने जात असताना काही वैद्याकीय समस्या उद्भवल्यास त्याला मोबाईल अॅपवर जवळील सरकारी रुग्णालयाची माहिती उपलब्ध होणार आहे. जेणेकरून तो त्या ठिकाणी पोहोचून उपचार घेऊ शकतो. तसेच भविष्यात यामध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चालक, डॉक्टरचा भ्रमणध्वनी क्रमांकही कळणार
अॅपवरून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेच्या चालकाचा किंवा त्यातील डॉक्टरचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहोचली, किती वेळात पोहोचणार आहे, याची अचूक माहिती ओला, उबर या अॅपप्रमाणे मोबाईलवर दिसणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास एक ते दोन मिनिटे लागणार असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईक रुग्णाला घरातून बाहेर आणू शकतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 07/Nov/2024














