रत्नागिरी : जिल्ह्यातील विधानसभेच्या फडात राजकीय कार्यकर्ते जोमात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत अखेर ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले असून निवडणुकीचा फड उभा राहिला आहे. या फडावर आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात आले आहेत.

निवडणूक मग कुठलीही असो, ती कार्यकर्त्यांच्या जोरावरच लढवावी लागते. खंदे व निष्ठावान कार्यकर्ते असले की, निवडणूक लढणे व ती जिंकण्यासाठीचे आव्हानही कार्यकर्ते प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडतात. परंतु, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की, हौशी कार्यकर्त्यांचेही पीक जोमात येते.

उमेदवारांना निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांची गरज लागतच असते. त्यामुळे उमेदवार या कार्यकत्यांसाठी दिमतीला गाडी, प्रचार करून दमल्यानंतर श्रमपरिहाराची सोय, जेवणावळी यासोबतच इतरही व्यवस्था केली जात असल्याने कार्यकर्त्याचा भाव वधारलेला असतो. ‘त्यांची दहाही बोटे… जातील’ अशी स्थिती असते. निवडणुकीच्या आधी होणाऱ्या मेळाव्यात पक्षाची कामे करताना नेते आतापर्यंत फक्त पदाधिकाऱ्यांना महत्व देत होते. बैठक असो की, उपक्रम, फक्त पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जायचे; पण आता निवडणूक लागली आहे. उमेदवारांना आता प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचायचे असते. त्यासाठी या कार्यकर्त्यावरच मदार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारांना केवळ १५ दिवस उरले आहेत. त्यात कार्यकत्यांकडून प्रचार करून घ्यायचा आहे. त्यासाठी अन्यवेळी दुर्लक्षित असलेल्या कार्यकर्त्याची बडदास्त ठेवण्याकडे राजकीय नेतेमंडळींचा कल आहे. कार्यकर्ते खुश तर ते उमेदवारही खुश. उमेदवारांनी आता या बडदास्तीकडेच सर्व लक्ष केंद्रित केले आहे.

निवडणुकीच्या रंगात कार्यकर्त्यांना महत्त्व आले असून उमेदवारांकडून कार्यकत्यांची सोय कशी होईल याचीच खबरदारी घेतली जात असून कार्यकर्ते तेजीत असून कार्यकर्त्यांची ऊठबस करण्याकडेच उमेदवाराचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 07/Nov/2024