दापोली : दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दापोलीत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दापोलीतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यापैकी दापोली-खेड रस्ता, दापोली-हर्णे बंदर रस्ता, मुरुड हे मुख्य मार्ग खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे याही दिवाळीत पर्यटकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी दिवाळीत लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटक दापोलीतील अर्थव्यवस्थेत भर घालतात. त्यामुळे येथील लहान मोठ्या व्यवसायांना चालना मिळते. मात्र खराब रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने याचा थेट परिणाम पर्यटनावर होताना दिसत आहे.
दापोलीतील पर्यटनक्षेत्राचा विकास, येथील सोयीसुविधांमध्ये सुधारणा करणार, अनेक गरजूंच्या हाताला काम देणार, अशी आश्वासने निवडणुकांच्या तोंडावर जनतेला देण्यात येतात. मात्र निवडणुका झाल्या की येरे माझ्या मागल्या अशी अवस्था होते. दापोलीतील पर्यटनाचा गवगवा हा दूरदूर पोहोचला आहे. त्यामुळे दापोलीत जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक दापोलीत येतात; मात्र येथील खराब रस्त्यांची अवस्था दरवर्षी चर्चेचा विषय ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 07/Nov/2024














