गुहागर : दिवाळी सुट्टयांमुळे पर्यटकांनी कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेल्या गुहागरात मोठी गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉन, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहेत. मात्र, गुहागर चौपाटीवर किनाऱ्यावरील पोलिस कर्मचारी आणि बंदर विभागाच्या सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना समुद्रात आंघोळ करण्यास व सायंकाळी सात वाजल्यानंतर बसू दिले जात नसल्याने पर्यटकांसह स्थानिक स्टॉलधारक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गुहागरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला असून, या हंगामाची सुरुवात दिवाळीतील सलग पडलेल्या सुट्टयामुळे झाली आहे.
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक स्वच्छ, सुंदर समुद्रचौपाटी लाभलेल्या ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येतात. गुहागरमधील अनेक देवस्थाने ही मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी राहणाऱ्यांची कुलदैवत असल्याने कामानिमित्त स्थलांतरित झालेली मंडळी गुहागरात येत असतात. दुसरीकडे इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलेले पर्यटक हे वर्षांनुवर्षे पर्यटनासाठी गुहागरची निवड करत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या याठिकाणी लक्षणीय असते. दिवाळी सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटिंग, घोडेस्वार, खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी इथल्या व्यवसायिकांनी अत्याधुनिक दर्जाची हॉटेल व राहण्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. चित्रपट व टीव्ही मालिकामुळे गुहागरचे सुंदर रूप सर्वदर पोहोचल्याने पर्यटकांचा ओढा वावत आहे. गुहागर शहरात आलेले पर्यटक समुद्र चौपाटी, सुरू बनाचा आणि लांबलचक समुद्रकिनाऱ्यााचा आनंद घेतात.
समुद्रस्नान आणि रात्री पर्यटकांना मज्जाव
समुद्रात सुरक्षितपणे आंघोळ करता यावी म्हणून नगरपंचायतीकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत, परंतु, गेल्या काही दिवसांपासून बंदर विभागाकडून ठेवण्यात असलेले सुरक्षा रक्षक व पोलिस कर्मचारी समुद्रात आंघोळ करणाऱ्या पर्यटकांना आणि किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकांना सायंकाळी मज्जाव करतात. इतक्या लांबून येऊन चौपाटीवर आनंद लुटता येत नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काही पर्यटक तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर जाणे पसंत करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 07/Nov/2024














