मंडणगड : संस्कारांच्या दीपोत्सवात आई-वडिलांचे गुणगान

मंडणगड : स्व. सुरेखाबाई सहदेव माळी यांच्या पुण्यस्मरणनिमित्त आयोजित जाखडी नृत्य स्पर्धेत सादरीकरणातून आई-वडिलांचे गुणगान गाण्यात आले. पालेकोंड येथील माळी कुटुंबाच्यावतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला संस्कारांचा दीपोत्सव कार्यक्रम प्रबोधनात्मक सामाजिक संदेश देणारा ठरला.

२ नोव्हेंबर २०२४ रोजी पालेकोंड येथे हा अभिनव उपक्रम झाला. माळी कुटुंबाने आपल्या स्व. आईच्या आठवणींना उजाळा देताना सामाजिक संदेशात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रथम गायक दीप जोशी यांनी सुमधुर आवाजात आई वडिलांचे महात्म्य सांगणारे अमृताचे तीर्थ चरणी हे गीत सादर केले.

तृषा माळी हिने आजीच्या आठवणी सांगताना कौटुंबिक आयुष्यातील तिचे महत्त्व विशद केले. व्याख्याते शांताराम पवार यांनी सुरेखाबाई यांचा जीवनपट उलगडताना मुलगी, पत्नी, आई, आजी, अंगणवाडी मदतनीस या विविध स्तरावरील त्यांचे आदर्शवत असणारे गुणविशेष सांगितले. शेवटी सामाजिक संदेश देताना उपस्थितांना वैचारिक मंत्रमुग्ध केले. यानंतर आई-वडिलांचे महात्म्य सांगणारी जाखडी नृत्य स्पर्धा उत्तरोत्तर रंगली. यामध्ये सात नाच मंडळ सहभागी झाले होते.

वयवर्ष सात ते पंच्याहत्तर वयोगटातील कलाकारांनी कलात्मक सादरीकरणातून रसिकांचे मनोरंजन करताना एकाच जागी खिळवून ठेवले.

स्पर्धेत मुमुर्शी करंजमाल, तुळशी, मूर, पेण तर्फे तळे, सव उगवतीवाडी, सव देऊळवाडी, चोचिंदे यांनी अनुक्रमे पहिला ते सातवा क्रमांक मिळविला. उत्कृष्ट गायक महेश शिंदे, ढोलकीपडू तनीष चाचले, गीतकार प्रल्हाद शिरशिवकर व भाग्यवान प्रेक्षक म्हणून समीर रक्ते यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला, युवा मंडळी उपस्थित होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 07/Nov/2024