रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाकडून गणेशगुळे गणपती मंदिर परिसरासह शाळेची स्वच्छता

पावस : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, भातकापणीचा अनुभव, गणेशगुळे गणपती मंदिर परिसर व शाळां परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ, चर्चासत्रे, स्पर्धांचे आयोजन केले आहे. कुर्षे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात सुरु असलेल्या शिबिराच्या उ‌द्घाटनप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे म्हणाले की, आनंददायी शिबिरातून भविष्यासाठी चांगले सोबती मिळतात व एनएसएसचे कुटुंब तयार होते. एनएसएसमधून सशक्त संस्कारित नागरिक घडतात. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनील गोसावी यांनी शिबिरात आत्मविश्वास वाढीस पूरक उपक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व सत्रात मनापासून सहभागी होण्याचे आवाहन केले.

शिबिराचा व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करून घ्या, असे सांगितले. प्रा. दुदगीकर यांनी मनोगतात एनएसएस सुसंस्कृत छात्रशक्ती निर्माण करते, असे सांगितले, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी एनएसएस सामाजिक समस्या निराकरण करणारा, स्वयंशिस्त, स्वावलंबनयुक्त जागरूक व सत्यप्रिय नागरिक घडवतो, असे सांगितले. कार्यवाह आनंद मराठे यांनी विद्याथ्यांनी मोबाईलपासून दूर राहात शिबिरात ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घ्यावा. फुलासारखे समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 07/Nov/2024