वाशिष्ठी नदीत श्रीफळ अर्पण करून होणार नारळ मिरवणुकीची सांगता; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
चिपळूण:
शहराचे सुप्रसिद्ध व जागृत श्रद्धास्थान, ग्रामदैवत ‘श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण’ यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमा उत्सव सोमवार, २४ ऑगस्ट ते गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, भजनाचे जागर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचे चार दिवसांचे सविस्तर वेळापत्रक
- सोमवार, २४ ऑगस्ट: रात्रौ १० ते १२ या वेळेत श्री जुना काळभैरव मंदिरात ओझरवाडी ग्रामस्थ श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ, चिपळूण यांचा भजनाचा जागर पार पडेल.
- मंगळवार, २५ ऑगस्ट: सकाळी ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव, श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार, श्री देवी जाखमाता (वैश्यवसाहत) आणि श्री देवी ऐकवीरा (वडनाका) यांना ‘पौवते’ (पवित्रक) अर्पण करण्याचा धार्मिक विधी होईल.
- बुधवार, २६ ऑगस्ट: रात्रौ १० ते १२ या वेळेत श्री क्षेत्र गांधारेश्वर येथील श्री देवी भवानी मंदिरात भोई समाज भजन मंडळ (खालची भोईवाडी), चिपळूण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
- गुरुवार, २७ ऑगस्ट:
- सकाळी श्री देवी भवानी व श्री कात्रादेवी (श्री क्षेत्र गांधारेश्वर) यांना पौवते (पवित्रक) अर्पण केले जातील.
- सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री जुना कालभैरव सभामंडपात नारळी पौर्णिमा व संस्कृत दिनानिमित्त विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ यांच्या विद्यार्थ्यांचा संस्कृत सुभाषिते, कथा, स्तोत्र, कोडी व संभाषणाचा कार्यक्रम होईल.
पारंपारिक नारळ मिरवणूक
गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरातून सवाद्य नारळ मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक ब्राम्हण आळी, राऊत आळी गणपती मंदिर, वैश्यवसाहत (शेट्ये आळी), श्रीराम चौक, मुरादपूर मिठागरी मोहल्ला, साळी वाडी, कुंभारवाडी आणि भोई वाडीमार्गे श्री क्षेत्र गांधारेश्वर जवळील वाशिष्ठी नदीवरील रेल्वे पुलापर्यंत जाईल. तेथे वाशिष्ठी नदीत अधिकृतपणे श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सवाची सांगता होईल.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत चिपळूणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:53 22-08-2026














