धामणी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह झुडपात कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी बडदवाडी येथे नदी पात्राजवळ एका झुडपात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

सगंमेश्वर तालुक्यातील धामणी येथील प्रशांत बुद्धम पवार हा युवक २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घरातून निघून गेला. यावेळी त्याने आपण अहमदाबाद येथे जातो, असे घरच्यांना सांगितले होते. बरेच दिवस झाले तो घरी न आल्याने व कोणताही संपर्क त्या काळात न झाल्याने संगमेश्वर पोलिस ठाणे येथे तो बेपत्ता असल्याची नोंद दाखल करण्यात आली होती. या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धामणी-बडदवाडी नदी पात्राजवळ झुडपात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, हा घातपात की आत्महत्त्या, अशी चर्चा सुरु असून पोलीस तपासातून नेमकी घटना स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 08-11-2024