गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील कोल्हटकर तिठ्यातील मुख्य मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून सांडपाणी आल्याने येथून जाताना पर्यटक तसेच स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
ऐन दिवाळी पर्यटन हंगामात या सांडपाण्याचा भाविक व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील कोल्हटकर तिठ्यातील मुख्य मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या भेडसावत आहे. या मार्गावर येणारे पाणी थेट मोरया चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही वाहत असते. या मुख्य मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांद्वारे सांडपाणी येथून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने अनेक पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली.
कोल्हटकर तिठा परिसरातील काही हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांकडून हे सांडपाणी चेंबर लाईनमध्ये सोडले जाते. मात्र या चेंबर लाईन वारंवार तुंबत असताना देखील संबंधित हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांकडून कुठलीही उपाययोजना हाती घेतली जात नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून कुठलीही कारवाई अद्याप संबंधितांवर करण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 08-11-2024














