गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे शृंगारतळीत येणार आहेत, अशी माहिती मनसेचे कोकण विभागाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली.
आगामी विधानसभेमध्ये त्रिशंकू अवस्था असेल. त्यामुळे सत्तेच्या पटावर मनसे किंगमेकरच्या भूमिकेत दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
वैभव खेडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे यांच्या प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. मनसेचे गुहागर विधानसभेचे उमेदवार प्रमोद गांधी आणि दापोलीचे उमेदवार संतोष अबगुल यांच्या प्रचारासाठी ते शृंगारतळीला येणार आहेत. शुक्रवारी दुपारी ११ वाजता ही प्रचार सभा आयोजिली आहे. अन्य प्रचार सभांप्रमाणे ही सभा केवळ प्रचाराची नसेल तर राज ठाकरे या वेळी कोकणच्या विकासाचे मनसेचे व्हिजन सर्वांसमोर ठेवतील. महाराष्ट्रात १४० जागा मनसे लढवत आहे. जनतेकडून या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मनसेचे आमदार चांगल्या संख्येने निवडून येतील. आगामी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसेल. त्यामुळे मनसेची भूमिका किंगमेकरची ठरेल,” असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 08-11-2024














