चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने मंगळवारी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या वेळी चिपळूणमधील ज्येष्ठ महिला रंगकर्मी रेखा कोळथरकर, रंजना वाडकर-पाथरे, शोभा कापडी-वाडकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या तीनही महिला कलाकारांची मुलाखत घेऊन त्यांचा रंगभूमीवरील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये झालेल्या या रंगभूमी दिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ महिला कलावंत रेखा कोळथकर यांचा सत्कार परिषदेच्या मुख्य सचिव डॉ. मीनल ओक यांनी केला. रंजना वाडकर पाथरे यांचा सत्कार अॅड. विभावरी रजपूत यांनी तर अपर्णा नातू यांनी रंगकर्मी शोभा कापडी-वाडकर यांचा सन्मान केला.
यावेळी डॉ. मीनल ओक यांनी रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच सत्कारमूर्ती महिला रंगकर्मीविषयी थोडक्यात माहिती दिली. यानंतर रंगकर्मी मिलिंद साल्हे, उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, नाट्यपरिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी महिला कलाकारांविषयीच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले.
या कार्यक्रमात चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, सतीश खेडेकर, राधिका पाथरे यांनी तिन्ही महिला रंगकर्मीचा खास सत्कार केला. यावेळी माजी सभापती पूजा निकम यांनीही महिला रंगकर्मीचा सन्मान केला. यानंतर रेखा कोळथरकर, रंजना वाडकर पाथरे व शोभा वाडकर यांची मुलाखत योगेश बांडागळे यांनी घेतली. या मुलाखतीमधून रेखा कोळथरकर, रंजना पाथरे-वाडकर, शोभा कापडी वाडकर यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. रेखा कोळथरकर यांनी प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात मुख्य नायिका साकारल्याची आठवण सांगितली.
काबा वाडकर, मंगेश डोंगरे, रघुनाथ कासेकर, अभय दांडेकर, आशा खलाटे, संतोष खलाटे, अदिती देशपांडे, हास्य क्लबच्या सदस्या अशी विविध क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 08/Nov/2024