‘भक्ती बर्वे इनामदार करंडक’ राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘तू पालनहारी’ नाटकाची अंतिम फेरीत धडक!

'भक्ती बर्वे इनामदार करंडक' राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या 'तू पालनहारी' नाटकाची अंतिम फेरीत धडक!

रत्नागिरी : पुणे येथील ‘स्पेशल फोर्टी फेसबुक ग्रुप’ आणि ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ यांच्या वतीने आयोजित मानाच्या ‘भक्ती बर्वे इनामदार करंडक’ राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘स्टार थिएटर रत्नागिरी’ निर्मित ‘तू पालनहारी’ या दोन अंकी नाटकाची पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी दिमाखदार निवड झाली आहे. अमेय धोपटकर लिखित आणि आप्पा रणभिसे दिग्दर्शित या नाटकाने राज्यभरातून आलेल्या ३३ नाटकांच्या चुरशीमधून अंतिम नऊ नाटकांमधे स्थान पटकावले आहे.

केवळ २ अभिनेते आणि ४४ भूमिकांचे आव्हान!
‘तू पालनहारी’ या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण दोन अंकी नाटकामध्ये एकूण ४४ विविध भूमिका आहेत. या सर्वच्या सर्व ४४ भूमिका रत्नागिरीचे दोन कसलेले अभिनेते श्री. विलास जाधव आणि समीर इंदुलकर रंगमंचावर साकारतात. प्राथमिक फेरीच्या रेकॉर्डिंग फेरीत त्यांच्या या अफाट अभिनय कौशल्याची आणि दिग्दर्शनाची सर्व परीक्षकांनी विशेष दखल घेतली.

कल्पक नेपथ्य आणि ‘शॅडो प्ले’चा अनोखा प्रयोग
तांत्रिक दृष्टीनेही हे नाटक अत्यंत आगळेवेगळे ठरले आहे:

नेपथ्य व शॅडो प्ले: पूर्णपणे मोकळ्या रंगमंचावर केवळ ‘शॅडो प्ले’ (Shadow Play) च्या माध्यमातून मुंबईतील वेगवेगळी ठिकाणे व वातावरण नेपथ्यात जिवंत करण्याचे शिवधनुष्य नेपथ्यकार श्री. विनायक आपकरे आणि आकाश रणभिसे यांनी लीलया पेलले आहे.

प्रकाश व ध्वनी संयोजन: शॅडो प्लेच्या नेपथ्याला साजेसा आणि दृश्यांची परिणामकारकता वाढवणारा प्रकाशयोजना रत्नागिरीचे सुप्रसिद्ध प्रकाशयोजनाकार श्री. अनिकेत गानू यांची आहे. नाटकाचे ध्वनी संयोजन ज्येष्ठ रंगकर्मी श्री. चंद्रकांत आंबेरकर यांनी केले आहे.

पार्श्वसंगीत: नाटकाला साजेसे पार्श्वसंगीत श्री. विशाल नाटेकर आणि संतोष सनगरे यांनी दिले आहे.

वेशभूषा, रंगभूषा व व्यवस्थापन: ४४ विविध पात्रांची जलद आणि अचूक वेशभूषा ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विजय पोकळे यांची असून, प्रभावी रंगभूषा श्री. निवराज मणचेकर यांनी केली आहे. रंगमंच व्यवस्था श्री. अभिजीत डोंगरे यांनी सांभाळली आहे.

रत्नागिरी व कोकणासाठी अभिमानाचा क्षण
सदर नाटकाची अंतिम फेरीसाठी झालेली निवड ही केवळ स्टार थिएटरसाठीच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी आणि कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे मनोगत नाटकाचे सूत्रधार तथा स्टार थिएटरचे खजिनदार श्री. संजय कांबळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, स्टार थिएटरचे सदस्य आणि मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते श्री. मनोज कोल्हटकर आणि वैभव मांगले यांनी ‘तू पालनहारी’ नाटकाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.