रत्नागिरी: मिरजोळेत एमआयडीसीत घरफोडी; ८.७३ लाखांचा ऐवज चोरीला

रत्नागिरी: मिरजोळेत एमआयडीसीत घरफोडी; ८.७३ लाखांचा ऐवज चोरीला

पोलिसांचा तपास सुरू

रत्नागिरी : औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मिरजोळे येथील एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि परकीय चलन असा एकूण ८ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरमालक बाहेरगावी गेले असताना ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शालिनी शंकर गंजे (५०, रा. बहार बंगला क्र. ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी, एमआयडीसी मिरजोळे) या ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घर बंद करून जळगाव येथे गेल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी त्या रेल्वेने रत्नागिरीकडे परतत असताना घराच्या साफसफाईसाठी आलेल्या महिलेने दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी गंजे यांना घटनेची माहिती दिली.

गंजे सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे आढळले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अमेरिकन डॉलर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.