पावस येथे श्रीमत् स्वामी स्वरूपानंद महाराज पुण्यतिथी उत्सव; अखंड ७२ तास नामजप व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पावस येथे श्रीमत् स्वामी स्वरूपानंद महाराज पुण्यतिथी उत्सव; अखंड ७२ तास नामजप व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

८ सप्टेंबर रोजी समाधी महायात्रेचे काव्य गायन, ग्रंथ प्रकाशन व प्रवचन सोहळा; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पावस (रत्नागिरी) : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस (रत्नागिरी) यांच्या वतीने ‘श्रीमत् स्वामी स्वरूपानंद महाराज पुण्यतिथी उत्सव’ मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवांतर्गत २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान श्री. नर्मदाप्रसाद जोशी यांच्याद्वारे ‘श्रीमत् भागवत सप्ताह’ संपन्न झाला असून, ५ सप्टेंबरपासून अखंड नामजपासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.

अखंड ७२ तास ‘ॐ राम कृष्ण हरि’ नामजप

उत्सवानिमित्त ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अखंड ७२ तास ‘ॐ राम कृष्ण हरि’ नामजपाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामजपाचा आरंभ शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजताच्या आरतीनंतर झाला असून, सांगता मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजताच्या आरतीने होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ऑनलाईन जपासाठी भक्तांनी ७२६१९५०१६३ या क्रमांकावर नावे नोंदवावीत.

मंगळवार, ८ सप्टेंबर रोजीचे विशेष कार्यक्रम

मंगळवारी सकाळी ८:४५ वाजता शंखनाद तसेच स्वामींच्या समाधी प्रस्थान प्रसंगी घडलेल्या वृत्तांताचे कथन होईल. त्यानंतर ‘समाधी महायात्रेचे स्वामी रचित काव्य गायन’ सादर केले जाईल. सकाळी १०:०० वाजताच्या आरतीनंतर पालखी प्रदक्षिणा संपन्न होईल, तर दुपारी १२:०० वाजताच्या आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वरूप प्रसाद’ ग्रंथ प्रकाशन व प्रवचन

सायंकाळी ४:०० वाजता सौ. मीनाताई व रघुनंदन जोशी लिखित ‘स्वरूप प्रसाद (प्रथम खंड)’ या ग्रंथाचे प्रकाशन सौ. धनश्रीताई लेले (ठाणे) यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता सौ. धनश्रीताई लेले यांचे ‘श्री स्वामी वाङ्मय संपदा’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या सर्व मंगलमय कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.