गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; पुणे-रत्नागिरी दरम्यान धावणार विशेष ट्रेन्स

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; पुणे-रत्नागिरी दरम्यान धावणार विशेष ट्रेन्स

१२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत फेऱ्या; आरक्षण प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ट्रेन ऑन डिमांड’ (Train on Demand) अंतर्गत १२ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत या फेऱ्या चालवण्यात येणार असून, यामुळे नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होऊन चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे-रत्नागिरी विशेष फेऱ्या

गाडी क्रमांक ०१४४७ पुणे-रत्नागिरी विशेष ट्रेन १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी पुण्याहून मध्यरात्री १२:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीत दाखल होईल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१४४८ रत्नागिरी-पुणे विशेष ट्रेन त्याच दिवशी सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२० वाजता पुण्यात पोहोचेल.

गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे-रत्नागिरी अतिरिक्त फेऱ्या

गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी विशेष ट्रेन १५ आणि २२ सप्टेंबर रोजी पुण्याहून मध्यरात्री १२:२५ वाजता सुटेल व सकाळी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०१४४६ ही ट्रेन त्याच दिवशी सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२० वाजता पुण्यात पोहोचणार आहे.

गाडीचे प्रमुख थांबे आणि आरक्षण सुविधा

या विशेष गाड्यांना मार्गातील चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह सुरू झाले असून प्रवाशांना रेल्वेच्या संगणकीकृत तिकीट खिडक्यांवरून (PRS) तसेच ‘आयआरसीटीसी’च्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करता येणार आहे.