गुहागर : पालशेत येथे नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण

गुहागर : गुहागर तालुक्यातील नव्याने रुजू झालेल्या सर्व नवनियुक्तशिक्षण सेवकांचे प्रशिक्षण ४ ते १० नोव्हेंबर दरम्यान आर. पी. पालशेतकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत या ठिकाणी होत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी केले.

यावेळी केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रताप देसले, रवींद्र कुळे, दिनेश जागकर, मनोज पाटील, दशरथ कदम, नरेंद्र देवळेकर व सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक उपस्थित होते.

शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे एकविसाव्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. प्रशिक्षणामध्ये शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, शालेय अभिलेख सेवाशर्ती व नियमावली, विद्यार्थी लाभाच्या योजना, अध्यापन पद्धतीची स्वायत्तता, कला व क्रीडा कथाकथन व अनुभवाधारित अध्यापन एकात्मिक अध्ययन, समावेशित शिक्षण, वंचितांचे शिक्षण, वयानुरूप वर्गात प्रवेश, मुलींचे शिक्षण, प्रारंभिक बाल्यावस्था व संगोपन शिक्षण, अध्ययन पद्धती, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन, शिक्षण हक्क अधिनियम २००९, बालकाचे हक्क व सुरक्षितता या संदर्भातील कायदे, बहुविध बुद्धिमत्ता सामाजिक व भावनिक शिक्षण आदी अनेक विषयांबाबत माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. सूत्रसंचालन दिनेश जागकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 08/Nov/2024