देवरूख-रत्नागिरी मार्गावर गवारेड्याच्या धडकेत जखमी झालेल्या स्वप्नील पेडामकरची मृत्यूशी झुंज अपयशी

देवरूख-रत्नागिरी मार्गावर गवारेड्याच्या धडकेत जखमी झालेल्या स्वप्नील पेडामकरची मृत्यूशी झुंज अपयशी

आंबव येथील अपघातात गंभीर जखमी; तीन दिवसांनंतर डेरवण रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे जंगलातून अचानक आलेल्या गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील तरुण स्वप्नील पेडामकर (वय ३७) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण साडवली व सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

मोटारसायकलला गवारेड्याची जोरदार धडक

स्वप्नील पेडामकर हा शुक्रवारी सकाळी कामानिमित्त आपल्या मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे निघाला होता. सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास आंबव परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलातून अचानक एक गवारेडा धावत रस्त्यावर आला. गवारेड्याने थेट मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने स्वप्नील रस्त्यावर फेकला गेला. या भीषण धडकेत त्याच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापती झाल्या होत्या.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

अपघातानंतर त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात व नंतर रत्नागिरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
मित्रांनी दहीहंडीचा निधी दिला होता

उपचारासाठी; गावात हळहळ

स्वप्नीलच्या उपचारासाठी साडवली सह्याद्रीनगर मित्र मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून उत्सवाचा संपूर्ण निधी उपचारासाठी दिला होता. मात्र मित्रांचे आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडल्याने तरुणांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नीलच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आज मंगळवारी सकाळी ९ वाजता साडवली येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.