रत्नागिरी : मच्छिमार सहकारी संस्थांनी अर्ज, तक्रारी करूनही मिरकरवाडा बंदरावर खासगी पेट्रोल पंपांचे टँकर येवून डिझेल विक्री करण्याचे बंद झालेले नाही. त्यामुळे मिरकरवाडा बंदर व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील डिझेल विक्रीचा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा सवाल मच्छिमारांमधून विचारला जात आहे.
मिरकरवाडा बंदर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर आहे. या ठिकाणी मच्छिमार सहकारी संस्थांचे डिझेल पंप आहेत. या सहकारी संस्था मच्छिमार नौकांना डिझेल पुरवठा करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमार नौकांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे त्यांचा शासकीय डिझेल कोटा कमी झाला आहे. त्याचबरोबर डिझेल विक्रीवर मिळणारे कमिशनही कमी झाले आहे. मच्छिमार सह. संस्थांच्या डिझेल पंपांना मिळणारा डिझेल कोटा कमी झाला आहे. त्याचवेळी कंपन्यांकडून मिळणारे कमिशनही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत मिरकरवाडा बंदरावर खासगी पेट्रोल पंपांचे टँकर येवून डिझेल विक्री करत आहेत. त्यामुळे मच्छिमार सहकारी संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत.
मच्छिमार संस्थांनी यापूर्वी मिरकरवाडा बंदरावर टँकरने डिझेल विक्री होण्याबाबत पुरवठा विभाग आणि मिरकरवाडा बंदर व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु या तक्रारींसंदर्भात कोणतीही दखल घेतली जात नसल्याने टँकरने डिझेल विक्री सुरूच आहे. यातील काही टँकरना डोअर टू डोअर विक्रीची परवानगी असल्याचेही सांगितले जात आहे.
बंदरावरील पथदीप अजूनही बंदच..
मिरकरवाडा बंदरावरील पथदीप गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद आहेत. याबाबतही मिरकरवाडा प्राधिकरणाकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु हे पथदीप सुरू व्हावेत, यासाठी सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 08/Nov/2024