चिपळूण : महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात विकास कामांचा झंझावात निर्माण केला. वाडीवस्तीत विकासकामे करून त्यांनी सामान्य जनतेशी नाळ जोडली आहे. मतदारसंघात त्यांनी विषेश कामांवरच सातत्याने भर दिला. त्यांनी जातीभेद न करता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी केले.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील अजिंक्य आर्केड येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत शेखर निकम यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या, त्यानंतर कापसाळ येथील माटे सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची सभा घेण्यात आली.
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, निकम हे अभ्यासू आणि मतदार संघात तळमळणीने काम करणारे आहेत, येथील मतदारांनाही त्याची जाण आहे. त्यांनी जातीभेद न करता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले. चिपळूणचा सांस्कृतिक वारसा जोपसण्याला त्यांनी पाठबळ दिले. कोरोना, महापूर, तसेच पर्यावरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
आमदार निकम म्हणाले, महायुतीने कल्याणकारी योजना राबविण्याला प्राधान्य दिले. लाडकी बहीण योजना प्रभावी ठरत असल्याने सुरुवातीला विरोधकांनी त्यावर टीका केली. आता तेच विरोधक लाडक्या बहिणींना आणखी जादाची रक्कम देण्याचे आमिष दाखवू लागले आहेत. बेरोजगार तरुण, ज्येष्ठ नागरिक, कलाकार, दिव्यांग, मुलींना मोफत शिक्षण अशा सर्वच घटकांसाठी महायुती सरकारने योजना राबवल्या, चिपळूण मतदारसंघात अडीच हजार कोटींची विकास कामे झालीत. पुढील काळात चिपळूण पूरमुक्त करण्यावर भर असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 08/Nov/2024














