रत्नागिरी : वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींच्या मतदानाचे दिवस जाहीर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे; परंतु प्रत्यक्षात मतदानाची पहिली सुरुवात ही कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार कर्मचारी १० नोव्हेंबरला पहिले मतदान करणार आहेत. निवडणूक कामासाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रशिक्षणाच्या ठिकाणी त्याच्यासांठी मतदान सुविधा केंद्राची उभारणी केली आहे. जिल्ह्यातील ६४६ दिव्यांग आणि ३ हजार ५८३ वयोवृद्ध मतदार हे १४, १५ आणि १६ नोव्हेंबरला घरातून मतदानाचा लाभ घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी ९ हजार १४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरला प्रशिक्षणाच्या ठिकाणी अनेकजण मतपत्रिकांवर मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्यास सुरवात करण्याची शक्यता आहे, तर पुढे होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षण आणि मतदान साहित्य वाटप करताना या सुविधा केंद्रावर मतदान केले जाणार आहे. जिल्ह्यात मतदान सुविधा केंद्रासोबतच ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार गृहमतदानातून जिल्ह्यात ३ हजार ५८३ वयोवृद्ध आणि ६४६ दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 08/Nov/2024