गणेशोत्सवातील वाहतूक कोंडीमुळे कामाला तात्पुरता ब्रेक; जेसीबी, पोकलेन जागेवरच ठप्प
चिपळूण:
Chiplun Flyover Work Delay मुळे शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीस खुला करण्याचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबरीकरण बहुतांशी पूर्ण झाले असले, तरी अवघ्या ५० मीटरच्या भरावाचे काम आणि जोडरस्ते अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवात चिपळूणकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
वाहनांच्या गर्दीमुळे काम थांबवले; यंत्रसामग्री जागेवरच उभी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात दाखल झाल्याने चिपळूण शहरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली. या काळात वाहतूक कोंडी अधिक जटिल होऊ नये, यासाठी जोडरस्त्याचे आणि भरावाचे काम सध्या अर्ध्यावरच थांबवण्यात आले आहे. यासाठी आणलेली जेसीबी, पोकलेन आणि डंपर यांसारखी सर्व यंत्रसामग्री सध्या जागेवरच उभी करण्यात आली आहे.

जोडरस्त्याचे काम सुरू असताना सर्व्हिस रोडच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही सलग तीन दिवस शहरात वाहतूक कोंडीचे सावट पाहायला मिळाले.
Chiplun Flyover Work Delay: प्रांत कार्यालय आणि पाग-बौद्धवाडी जोडरस्त्याचे आव्हान
उड्डाणपूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी चिपळूण प्रांत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अद्याप मोठ्या प्रमाणात भराव करणे बाकी आहे.
दुसरीकडे, बहादूरशेख नाका परिसरातील वाशिष्ठी पुलाजवळील जोडरस्त्याचे किरकोळ काम शिल्लक असून, पाग-बौद्धवाडी दरम्यानचा जोडरस्ता अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. दोन्ही बाजूंचे हे जोडरस्ते आणि आवश्यक भराव पूर्ण झाल्याशिवाय पुलाचा प्रत्यक्ष वापर सुरू होऊ शकणार नाही.
गणेशोत्सव संपल्यानंतर या कामाला पुन्हा गती देणे संबंधित यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. सर्व उर्वरित आणि जोडरस्त्यांची कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता हा उड्डाणपूल प्रत्यक्ष कधी सुरू होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













