साखरपा दूरक्षेत्र पोलिसांची कारवाई; ९ लिटर गावठी दारू जप्त
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरलीधरआळी येथे गोठ्याच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगून विक्री करणाऱ्या एका इसमावर देवरूख पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली असून संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोठ्याच्या पाठीमागे विक्री करताना सापडला :
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास देवरूख पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या साखरपा दूरक्षेत्राच्या पथकाने कोंडगाव मुरलीधरआळी येथे छापा टाकला. तेथील एका गोठ्याच्या पाठीमागे संशयित नरेंद्र राजाराम चव्हाण (वय ५० वर्षे, रा. कोंडगाव मुरलीधरआळी, ता. संगमेश्वर) हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या गावठी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ती स्वतःच्या कब्जात बाळगून असताना पोलिसांना रंगेहात मिळून आला.
दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल :
कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून ९५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद अनंत वाघाटे (वय ५७ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नरेंद्र चव्हाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गु.र.नं. १५१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करत आहेत.














