आईच्या आजारपणाच्या विवंचनेतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

आईच्या आजारपणाच्या विवंचनेतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

चुलत भावाला “हा माझा शेवटचा मेसेज” पाठवून संपवले जीवन; धाकटी जांभारी परिसरावर शोककळा

जयगड : आईच्या गंभीर आजारपणाच्या तणावातून आणि मानसिक विवंचनेतून २४ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने आपल्या चुलत भावाला व्हॉट्सॲपवर "हा माझा शेवटचा मेसेज आहे" असा निरोप पाठवला होता. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आईच्या आजारपणामुळे होता तणावात :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजित दत्ताराम तांडेल (वय २४ वर्षे, रा. धाकटी जांभारी, ता. जि. रत्नागिरी) याच्या आईवर नुकतीच ब्रेन ट्यूमरची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर आई अंथरुणाला खिळून असल्याने रंजित प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होता. या विवंचनेतून तो दारूच्या आहारीही गेला होता.

Infigo Eyecare

गणपती विसर्जनानंतर उचलले टोकाचे पाऊल :

दिनांक १९ सप्टेंबर रोजी घरातील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास रंजित याने आपल्या चुलत भावाच्या मोबाईलवर "हा माझा शेवटचा मेसेज आहे" असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवला. त्यानंतर त्याने सैतवडे पेठ मोहल्ला येथील स्मशानभूमीजवळील एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईकांनी तात्काळ त्याला खाली उतरवून उपचारासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

जयगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. ३६/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत. अवघ्या चोवीस वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.