आठवडा बाजारातील पाण्याच्या टाकीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; २४२ पुड्यांमध्ये अमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न उघडकीस
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ब्राऊन हेरॉईन या घातक अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नेपाळी नागरिकांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करत संशयितांकडून १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेपाळचे मूळ रहिवासी असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कुमार चौधरी ऊर्फ शिव बहादूर सोनार (वय ३२, मूळ रा. साडेपानी, जि. कैलाली, नेपाळ) आणि दुर्गा जीत बहादूर (वय ३१, मूळ रा. वॉर्ड क्र. ४, घोडाघोडी, जि. कैलाली, नेपाळ; दोघेही सध्या रा. पांढरा समुद्र, मुरुगवाडा, जि. रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

झडतीत २४२ पुड्यांमध्ये सापडले ब्राऊन हेरॉईन
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमित अशोक कदम आणि त्यांचे पथक रत्नागिरी शहर परिसरात शासकीय वाहनाने रात्रगस्त घालत होते. गस्तीदरम्यान आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ शिव कुमार चौधरी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची तात्काळ झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत २४२ पुड्यांमध्ये भरलेले ब्राऊन हेरॉईन मिळून आले.
१.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त केलेल्या ब्राऊन हेरॉईनचे प्लास्टिक पिशवीसह एकूण वजन ७ ग्रॅम असून, त्याची बाजारभावानुसार किंमत १ लाख २१ हजार रुपये आहे. विक्रीसाठी तयार केलेल्या प्रत्येक पुडीची किंमत ५०० रुपये होती. याशिवाय पोलिसांनी अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली भगव्या रंगाची पिशवी, पुड्या बांधण्यासाठीचे कागदाचे तुकडे आणि १५ हजार रुपयांचा ‘ओप्पो’ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३५९/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (क) व २१ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून या अमली पदार्थाचे मुख्य रॅकेट कुठे आहे, याचा शोध घेतला जात आहे.













