हॉलमधील लोखंडी चॅनलला नायलॉन दोरीने लावला गळफास; गुहागर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
गुहागर : गुहागर तालुक्यातील मौजे शीर भाटले आंबेकरवाडी येथे घरातील कौटुंबिक वादातून ५८ वर्षीय वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल :
मिळालेल्या माहितीनुसार, बबन सिताराम आंबेकर (वय ५८ वर्षे, रा. शीर भाटले आंबेकरवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबारा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी आपल्या राहत्या घरात जीवन संपवले. घरातील कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
हॉलमधील लोखंडी चॅनलला अडकवला गळफास :
घरातील हॉलमध्ये असलेल्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास तयार करून बबन आंबेकर यांनी गळफास लावून घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

गुहागर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :
घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ. क्र. ३९/२०२६) अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.













