Chiplun Crime News: चिपळूणच्या नांदगाव-भुवडवाडीत आरतीनंतर मारामारी; ९ जणांवर सावर्डे पोलिसांत गुन्हा दाखल

Chiplun Crime News: चिपळूणच्या नांदगाव-भुवडवाडीत आरतीनंतर मारामारी; ९ जणांवर सावर्डे पोलिसांत गुन्हा दाखल

जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी; पितळी टाळाच्या प्रहाराने पती-पत्नी जखमी

चिपळूण (रत्नागिरी):
चिपळूण तालुक्यातील नांदगाव-भुवडवाडी येथे गणपतीच्या आरतीनंतर जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान मारामारी झाल्याची घटना घडली. १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात दुखापत करणे, मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादावरून चर्चा करताना झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव-भुवडवाडी येथील वैभव गणपत ठोंबरे यांच्या घरी बाप्पाच्या आरतीसाठी वाडीतील ग्रामस्थ जमले होते. आरती पूर्ण झाल्यानंतर वैभव ठोंबरे हे राकेश लाखण व मारुती ठोंबरे यांच्याशी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाबाबत चर्चा करत होते. ही चर्चा सुरू असतानाच त्यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वैभव ठोंबरे यांनी शांततेने व समंजसपणे बोलून विषय मिटवण्याचे आवाहन केले, मात्र चिडलेल्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

Infigo Eyecare

पितळी टाळाने डोक्यावर व पाठीवर प्रहार

या झटापटीदरम्यान एका आरोपीने हातात असलेल्या पितळी टाळाने वैभव ठोंबरे यांच्या डोक्यावर जोरदार मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्या आरोपीने पाठीवर पितळी टाळाने प्रहार केल्याने मुका मार लागला. भांडण सोडवण्यासाठी आणि पतीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या विधी ठोंबरे यांच्या कपाळालाही झटापटीत टाळ लागल्याने त्या दुखापतग्रस्त झाल्या.

९ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा

या घटनेनंतर जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पीडित वैभव गणपत ठोंबरे यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राकेश सुरेश लाखण, सोमा जिरु लाखण, विजय शंकर ठोंबरे, संजय शंकर ठोंबरे, प्रविण गजानन ठोंबरे, किरण मास्ती ठोंबरे, प्रदीप गजानन ठोंबरे, गजानन लक्ष्मण ठोंबरे आणि मारुती लक्ष्मण ठोंबरे या नऊ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९० व १९१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.