रत्नागिरी शहरात मोकाट गुरांवर पालिकेची धडक कारवाई; १५ दिवसांत ७५ गुरे ताब्यात

रत्नागिरी शहरात मोकाट गुरांवर पालिकेची धडक कारवाई; १५ दिवसांत ७५ गुरे ताब्यात

गोसेवा संघाच्या माध्यमातून गोशाळांमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू; मुख्याधिकारी वैभव गारवे यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट गुरांच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये नगरपालिकेच्या पथकाने शहराच्या विविध भागांतून सुमारे ७५ मोकाट गुरांना ताब्यात घेतले आहे. पकडण्यात आलेल्या या गुरांना गोसेवा संघाच्या माध्यमातून सुरक्षितपणे विविध गोशाळांमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली.

मारुती आळीत गुरांच्या धडकेत महिला जखमी :
शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न सध्या अत्यंत गंभीर बनला असून चार दिवसांपूर्वीच मारुती आळी परिसरात मोकाट गुरांच्या कळपाने एका पादचारी महिलेला जोराची धडक दिली होती. या अपघातात ती महिला जखमी झाली. सुदैवाने त्या दिवशी बाजारपेठेत नेहमीसारखी मोठी गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, मोकाट गुरांच्या वाढत्या त्रासामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर नगरसेवक सुहेल मुकादम यांनी जखमी महिलेच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांची विचारपूस केली व आवश्यक वैद्यकीय मदत लागल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आश्वस्त केले.

विशेष पथकांची नेमणूक व शासकीय नियमांचे पालन :
या समस्येवर उपाययोजना करताना मुख्याधिकारी गारवे यांनी सांगितले की, मुख्य रस्त्यांवरील गुरांचा वावर रोखण्यासाठी नगरपालिकेने ३ ते ४ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र विशेष पथके तैनात केली आहेत. गोसेवा संघासोबत झालेल्या अधिकृत करारातील सर्व शासकीय अटी, शर्ती आणि प्राण्यांच्या सुरक्षेविषयक नियमांचे काटेकोर पालन करूनच ही गुरे गोशाळांकडे हस्तांतरित केली जात आहेत.

ronic

पशुपालकांना पालिकेचे आवाहन :
शहरात वावरणारी बहुतांश गुरे ही आजूबाजूच्या ग्रामीण भागातील असतात. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांमुळे कितीही गुरे पकडली तरीही ही समस्या कायमस्वरूपी आटोक्यात आणणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यांवर मोकाट न सोडता गोठ्यात बांधून ठेवावीत, असे जाहीर आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.