२ लाखांहून अधिक किमतीचे ब्राऊन हेरॉईन व गांजा जप्त; ‘रत्नसेतू चॅटबॉट’वर माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक आणि सेवन करणाऱ्या समाजकंटकांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जोरदार मोहीम उघडली आहे. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२ संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
जिल्हाभरात एकाच वेळी धडक मोहीम :
युवा पिढीला आणि समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणारे, ते बेकायदेशीरपणे जवळ बाळगणारे तसेच सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी पाळत ठेवून कारवाया केल्या. या मोहिमेत अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी १०, तर अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी ६ असे एकूण १६ गुन्हे दाखल करून २२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ब्राऊन हेरॉईनसह २ किलोहून अधिक गांजा जप्त :
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा तब्बल २ किलो ५११ ग्रॅम सुका गांजा हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या या दोन्ही अमली पदार्थांची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख २ हजार २०० रुपये इतकी आहे. केवळ कारवाया न करता ‘मिशन फिनिक्स’च्या माध्यमातून तरुणांमध्ये जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही पोलीस दल भर देत आहे.

माहिती देण्यासाठी ‘रत्नसेतू चॅटबॉट’चा वापर करण्याचे आवाहन :
जिल्ह्यात अमली पदार्थांची कुठेही छुप्या रीतीने विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केले आहे. तसेच नागरिक पोलिसांच्या ‘रत्नसेतू चॅटबॉट’च्या मोबाईल क्रमांकावरही गुप्तपणे माहिती देऊ शकतात. अमली पदार्थांच्या या अवैध जाळ्याचा बिमोड करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













