गुहागर भागात लवकरच एमआयडीसी साकारणार; ५ ते ६ हजार तरुणांना मिळणार रोजगार : सभापती प्रणव पोळेकर

गुहागर भागात लवकरच एमआयडीसी साकारणार; ५ ते ६ हजार तरुणांना मिळणार रोजगार : सभापती प्रणव पोळेकर

भातगाव-गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

गुहागर : भातगाव पंचक्रोशी किंवा पडवे-तवसाळ, पडवे-तांबड-बाबर तसेच चिंद्रावळे परिसरामध्ये पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लवकरच एमआयडीसी साकारणार असून, त्याद्वारे परिसरातील पाच ते सहा हजार स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असा ठाम विश्वास गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केला. गुहागर तालुक्यातील भातगाव-गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा संपन्न :
भातगाव-गोळेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या रेणुका आग्रे यांच्यासह विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर, अनंत डिंगणकर, गावकरी, मानकरी, जागा मालक आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यातून आणि प्रत्यक्ष योगदानातून हा विसर्जन तलाव साकारण्यात आल्याचे यावेळी आवर्जून नमूद करण्यात आले.

गुहागरच्या विकासासाठी स्थानिक रोजगारावर भर :
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सभापती प्रणव पोळेकर म्हणाले की, पंचायत समिती सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून महिला आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हेच मुख्य ध्येय राहिले आहे. आज गावागावांमध्ये पाहिले तर ८० टक्के लोक कामानिमित्त मुंबईत आहेत, तर उर्वरित वृद्ध आणि महिला वर्ग गावात राहतो. गुहागर तालुक्यातील हे चित्र बदलण्यासाठी आणि तरुण पिढीला गावातच स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एमआयडीसीची मागणी लावून धरली होती. या मागणीला पालकमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Tata motars

दलालांना आळा घालण्यासाठी जागांची नावे गोपनीय :
एमआयडीसीसाठी तीन ठिकाणच्या जागा निश्चित (आयडेंटिफाय) करण्यात आल्या असून, दलालांची लुडबूड टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून देण्यासाठी या जागांची नावे सध्या जाहीर केलेली नाहीत, असे पोळेकर यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाची घोषणा होताच दलालांचा हस्तक्षेप वाढून मूळ शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यामुळे योग्य वेळी पालकमंत्री स्वतः या एमआयडीसीची अधिकृत घोषणा करतील. सुमारे ५ ते ७ हजार रोजगार निर्माण करणारी ही एमआयडीसी गुहागर तालुक्याचे भविष्य बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले, तर अनंत गावडे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.