Khed Accident: भेलसई पुलावर दुचाकी कठड्यावर आदळून ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Khed Accident: भेलसई पुलावर दुचाकी कठड्यावर आदळून ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

आंबडसहून परतताना वळणावर ताबा सुटल्याने दुर्घटना; दोघे जखमी, खेड पोलिसांत गुन्हा दाखल

खेड (रत्नागिरी):
आंबडसहून भेलसईच्या दिशेने येताना दुचाकीवरील ताबा सुटून ती पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भेलसई चौथाई येथील भेलसई पुलाच्या मागील बाजूस असलेल्या तीव्र वळणावर आणि उतारावर घडला.

रुपेश धाडवे यांचा मृत्यू; अन्य दोघे जखमी

या अपघातात रुपेश सुरेश धाडवे (वय ३४, रा. भेलसई गंग धाडवेवाडी, ता. खेड) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. तर सर्वेश शिवाजी धाडवे यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून, दर्शन अनंत धाडवे (वय २१) यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

Fitness

आंबडसहून परतताना घडली दुर्घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन धाडवे, त्यांचे चुलत भाऊ रुपेश धाडवे आणि सर्वेश धाडवे हे तिघे आंबडस येथे चायनीज खाऊन यामाहा कंपनीच्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 43 CF 2177) भेलसईकडे परत येत होते. भेलसई पुलाजवळील वळणाच्या उतारावर रस्ता परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळली. या अपघातात रुपेश यांच्या डोक्याला भीषण दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

तपासानंतर खेड पोलिसांत गुन्हा दाखल

अपघातानंतर किरकोळ जखमी झालेले दर्शन धाडवे मुंबई येथे गेले होते. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्यांनी खेड पोलीस ठाण्यात हजर राहून अपघाताबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेची सविस्तर चौकशी पूर्ण केल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३१६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १२८/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या अपघाताचा पुढील अधिक तपास करत आहेत.