एक्सप्रेस गाड्यांचे थांबे व मूलभूत सुविधांसाठी ७० हून अधिक गावांतील प्रवाशांचा लढा; उपोषण तात्पुरते स्थगित
लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावर विविध लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने उपोषणस्थळी धाव घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनाला परिसरातील तब्बल ७० हून अधिक गावांतील प्रवाशांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
७० हून अधिक गावांतील प्रवाशांची होतेय गैरसोय :
लांजा तालुक्याच्या पूर्व भागात तसेच लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमावर्ती भागामध्ये विलवडे रेल्वे स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. लांजा व राजापूर तालुक्यांतील अनेक गावांसह अणुस्कुरा घाटमाथ्यावरील व वैभववाडी तालुक्यातील हजारो नागरिक रेल्वे प्रवासासाठी या स्थानकावर अवलंबून आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी हे स्थानक महत्त्वाचे असतानाही येथे पुरेशा एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला जात नाही. त्यामुळे मुंबई किंवा अन्य शहरांत जाण्यासाठी प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसून पुढील स्थानक गाठावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
मूलभूत सुविधांचा अभाव आणि दुरवस्था :
स्थानकावर केवळ एकच फलाट असल्याने गाडीत चढताना-उतरताना वृद्ध व महिला प्रवाशांची मोठी कसरत होते. तसेच स्थानकावरील प्रतीक्षालयाची दुरवस्था झाली असून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशी आसनव्यवस्था आणि सावलीसाठी निवारा यांसारख्या प्राथमिक सुविधांचाही मोठा अभाव आहे. या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटनेने लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले होते.

कोकण रेल्वे प्रशासनाशी यशस्वी चर्चा आणि आश्वासने :
आंदोलनाची तीव्रता आणि प्रवाशांचा वाढता रोष पाहून कोकण रेल्वेचे अधिकारी आंबर्डेकर व अहिरे यांनी लांजा तहसीलदार ढोले यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. यामध्ये प्रतीक्षागृह फलाटाला जोडून बांधणे, रॅम्पची सुविधा करणे, फलाटाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत करून पथदिवे बसवणे, रस्त्यावरील वीजपुरवठा सुरळीत करणे आणि उघडी ड्रेनेज टाकी बंदिस्त करण्याचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच दुसऱ्या फलाटाचा प्रस्ताव तयार करून पुढील महिन्यात सादर करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्याबाबत पाठवला प्रस्ताव :
रेल्वे मंत्रालयाकडे जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोचुवेली आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याबाबत पाठविलेल्या अधिकृत प्रस्तावाची सत्यप्रत रेल्वे अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सुपूर्द केली. प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनांनंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे मार्गी न लागल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे. पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले.













