राजापुरात बंद घराचे कुलूप तोडून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; गुन्हा दाखल

राजापुरात बंद घराचे कुलूप तोडून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; गुन्हा दाखल

गौरी-गणपती दर्शनासाठी कुटुंब बाहेर गेले असताना घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड चोरीला

राजापूर:
राजापूर तालुक्यातील खरवते-वाणीवाडी येथे घराला कुलूप लावून गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना समोर आली आहे. ही घरफोडी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान घडली.

माहेरी गेल्याची संधी साधून मारला दरोडा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सानिका संतोष गोरे (वय ४०, रा. खरवते, ता. राजापूर) यांनी या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गोरे या आपल्या पती आणि मुलीसह घराला तसेच मुख्य गेटला कुलूप लावून गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी तवडे येथे गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्टडी रूम आणि बेडरूममधील कपाटे उघडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख ३० हजार रुपये चोरून नेले.

Tata motars

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड लुटली

चोरीला गेलेल्या ऐवजात विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, अंगठी, नाकातील फुली, लॉकेट, नथ, चांदीचे पैंजण, कमरेची साखळी व चांदीचे नाणे यांचा समावेश आहे. दागिन्यांसह ३० हजार रुपयांची रोखड मिळून एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल; चोरट्याचा शोध सुरू

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळाची पहाणी करून अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.