“मोदी पप्पू आहेत, राहुल गांधी देशाचे नेते” : संजय राऊत

"मोदी पप्पू आहेत, राहुल गांधी देशाचे नेते" : संजय राऊत

राहुल गांधींच्या कार्यक्रमातील ‘मिमिक्री’ वादावरून राजकीय वातावरण तापले; महाराष्ट्राच्या कॅबिनेटला राऊतांनी हिणवले ‘जोकरांची फौज’

मुंबई:
इंदूर येथील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली मिमिक्री आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. "राहुल गांधींनी मारलेला बाण थेट भाजपच्या काळजाच्या आरपार घुसला असून त्यांनी मोदींना पप्पू ठरवले आहे," असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

देवेंद्र फडणवीसांची टीका आणि राऊतांचे प्रत्युत्तर

इंदूरच्या कार्यक्रमात कॉमेडियनने केलेल्या मिमिक्रीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "राहुल गांधी यांनी आता स्टँड-अप कॉमेडीचे काम हाती घेतले तर त्यांना चांगला रोजगार मिळेल," असा टोला लगावला होता. या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी देशाचे आर्थिक आणि परराष्ट्र धोरण सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. राहुल गांधींचा हा विषय थेट जनतेपर्यंत पोहोचत असल्याने फडणवीस आणि भाजप पूर्णपणे हादरले आहेत. राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी भाजपने शेकडो कोटी रुपये खर्च केले, मात्र आता राहुल गांधींनी मोदींना ‘पप्पू’ ठरवले आहे.

Mahrashi karve ANM

पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीवर राऊतांची आक्रमक शैली

संजय राऊत यांनी पुढे बोलताना थेट पंतप्रधान मोदींच्या भूतकाळातील भाषणांचा उल्लेख केला. "पंतप्रधान मोदी स्वतः लोकसभेत आणि बाहेर पंडित नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ज्या पद्धतीने नक्कल आणि कॉमेडी करत होते, तो कोणता प्रकार होता?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, "देशाचे पंतप्रधान लोकसभेत अशा चिपळ्या वाजवतात का? मिस्टर फडणवीस, लोकांनी तुम्हाला आणि भाजपला जोकर ठरवले आहे. देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तर जोकरांची मोठी फौजच भरली आहे," असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

‘विरोधी पक्षाच्या नेत्याला उत्तम नट असावे लागते’

विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल सांगताना राऊत म्हणाले की, देशातील अंधभक्तांना परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती सोप्या शब्दात समजावून सांगण्यासाठी अभिनयाचा वापर करावा लागतो. "अभिनयाचा ठेका काय फक्त नरेंद्र मोदींनीच घेतला आहे का? राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सर्व उत्तम अभिनय करून भूमिका मांडू शकतात," असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, देवेंद्र फडणवीसांना लवकरच दिल्लीत जायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरे जावेच लागणार आहे, त्यामुळे त्यांनी संयम बाळगावा, असा सल्लाही त्यांनी दिला.