रत्नागिरी जिल्ह्यातील ४६९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातील ४६९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवला गावांचा कारभार; निवडणुका लांबल्याने इच्छुकांची राजकीय गणिते कोलमडली

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ४६९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायतींचा कारभार आता थेट शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून कृषी, शिक्षण आणि आरोग्य विभागातील विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रखडलेली कामे मार्गी लावण्याची जबाबदारी

शासकीय प्रशासक आल्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. १५ व्या वित्त आयोगासह शासकीय अनुदानातून विकासकामे मंजूर करणे, निधी खर्च करणे, गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा सुरळीत ठेवणे ही मुख्य कामे प्रशासकांना करावी लागणार आहेत. याशिवाय जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर दुरुस्ती व नाल्यांची कामे राजकीय हस्तक्षेपाशिवाय तांत्रिक मंजुऱ्या मिळवून पूर्ण केली जातील. मुदत संपल्यामुळे आता माजी सरपंच सत्तेत राहिलेले नाहीत.

ronic

इच्छुक भावी उमेदवारांची राजकीय गणिते कोलमडली

ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील या आशेने गावागावात मोर्चेबांधणी करणाऱ्या आणि प्रचााराची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत. कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात होता; मात्र प्रशासक नियुक्तीमुळे निवडणुका आणखी काही महिने लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असल्याने भावी उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.