जिजाऊ व स्मार्ट बसेसवर होणार वाहतूक; खटारा बसेस भंगारात गेल्याने एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
रत्नागिरी: रत्नागिरी विभागातील अनेक जुन्या व खिळखिळ्या झालेल्या बसेस भंगारात गेल्यानंतर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी विभागासाठी लवकरच १५० नवीन ‘स्मार्ट बसेस’ उपलब्ध होणार असून, आणखी १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची मागणी नोंदवण्यात आली आहे. या नव्या बसेसमुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.
२०० हून अधिक बसेस भंगारात गेल्याने तुटवडा
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी विभागाकडे शहर व ग्रामीण भाग मिळून तब्बल ६५० एसटी बसेस होत्या. परंतु, मागील काही महिन्यांत २०० हून अधिक जुन्या बसेस भंगारात जमा झाल्याने एसटी गाड्यांचा मोठा तुटवडा जाणवत होता. सध्या उपलब्ध असलेल्या ६५० बसेसद्वारेच प्रवासी वाहतूक सुरू होती, ज्याचा थेट परिणाम वाहतूक सेवेवर होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी महामंडळाने नव्या ५ हजार स्मार्ट बसेस खरेदीचा निर्णय घेतला असून त्यातील १५० बसेस रत्नागिरी विभागाला मिळणार आहेत.

दिवाळीपर्यंत ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन सज्ज होणार
रत्नागिरी शहरात ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरू असून त्याचे टेंडरही काढण्यात आले आहे. विजेची जोडणी पूर्ण झाल्यावर दिवाळीपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर ई-बसेस रस्त्यावर धावू लागतील, अशी माहिती विभाग नियंत्रक आव्हाडजित जानराव यांनी दिली आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास ई-शिवशाहीने सुकर
पर्यावरणपूरक ई-शिवशाही बसेस सुरू झाल्याने रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील प्रवास सुकर झाला आहे. कोल्हापूर विभागाच्या ५ ई-बसेस सध्या या मार्गावर धावत असून त्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच दापोलीत आलेल्या ३४ ई-बसेसमुळे मुंबई व पुण्याकडे जाणारा प्रवासही सोयीचा झाला आहे.
रत्नागिरी विभागातील सध्याची बससंख्या:
शहरी बसेस: १८
साध्या बसेस: ५५३
शिवशाही: ३४
स्लिपर कोच: २४
ई-शिवशाही: २१
जिजाऊ बसेस: ६०













