Ratnagiri Government Medical College: रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे यशस्वी देहदान

Ratnagiri Government Medical College: रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे यशस्वी देहदान

नामदेव पाध्ये यांच्या पार्थिवाचे देहदान; वैद्यकीय संशोधनाला लाभणार गती

रत्नागिरी:
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देहदान प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, जोशी वठार (नाटे) येथील रहिवासी कै. नामदेव दामोदर पाध्ये (वय ८५) यांच्या पार्थिवाचे वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी यशस्वीरीत्या देहदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अभ्यासासाठी आणि वैद्यकीय संशोधनाला अधिक चालना मिळण्यासाठी पाध्ये कुटुंबीयांनी हे उदात्त पाऊल उचलले आहे. रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झालेले हे एकूण २३ वे देहदान ठरले आहे.

इच्छापत्राचा आदर करत कुटुंबीयांचा उदात्त निर्णय
नामदेव दामोदर पाध्ये यांचे १९ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने लोटलीकर हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले होते. समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपणाऱ्या कै. पाध्ये यांनी २० मार्च २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र अधिकृतपणे भरून दिले होते. त्यांच्या निधनानंतर पाध्ये कुटुंबीयांनी कोणत्याही कौटुंबिक दुःखाचा अथवा परंपरेचा अडसर न आणता, कै. पाध्ये यांच्या इच्छेचा पूर्ण आदर करत पार्थिवाचे देहदान करण्याचा अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक भान जपणारा निर्णय घेतला.

सन्मानदर्शक प्रमाणपत्राने पाध्ये कुटुंबीयांचा गौरव
देहदानाच्या या पवित्र कार्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते कै. पाध्ये यांचे सुपुत्र महेश पाध्ये यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानदर्शक प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

Fitness

याप्रसंगी कै. पाध्ये यांच्या स्नुषा शुभदा पाध्ये, कन्या अर्चना गोखले, सुषमा गगनग्रास, ज्योती नेने यांच्यासह जावई तसेच डॉ. महेंद्र पाध्ये, प्रभात पाध्ये, गोपीनाथ करंबेळकर आणि श्रीकांत गोखले यांच्यासह इतर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाध्ये कुटुंबीयांनी दाखवलेल्या या दातृत्वाचे आणि सामाजिक बांधिलकीचे संपूर्ण जिल्ह्यातून आणि वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

वैद्यकीय पथकाकडून प्रक्रिया पूर्ण
ही संपूर्ण देहदान प्रक्रिया महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, श्रेयस जोशी, राज पेडणेकर, नितीन घोसाळकर तसेच वाहनचालक सागर नारकर व प्रणय पाटील यांनी सक्रिय सहभाग घेऊन कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण केली.