३०० सभासदांपासून सुरू झालेला प्रवास राज्य कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचला; अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अर्थविश्व विस्तारत असून संस्थेने तब्बल ५० हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. स्थापनेवेळी केवळ ३०० सभासद आणि १० हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेली ही पतसंस्था आज ३५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था बनली आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कार्यविस्तार करत संस्थेने तब्बल ७६० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय साकारला आहे, अशी माहिती स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
३०० सभासदांपासून ते ५० हजार सभासदांचे ‘स्वरूप कुटुंब’
पतसंस्थेच्या या ३५ वर्षांच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, ३०० सभासदांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ५० हजार सभासदांच्या भक्कम विश्वासावर येऊन पोहोचला आहे. तालुका कार्यक्षेत्रापासून सुरू झालेली ही संस्था पुढे जिल्हा आणि आता राज्य कार्यक्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. आज १७ शाखांच्या माध्यमातून पतसंस्था आपल्या प्रत्येक ग्राहक आणि सभासदाला अत्यंत विश्वासार्ह, पारदर्शक व अचूक आर्थिक सेवा पुरवत आहे.
सभासदांची आर्थिक उन्नती आणि सामाजिक बांधिलकी
संस्थेच्या या आर्थिक यशात ५० हजार सभासदांचा सहभाग आणि सहकार्य मोलाचे ठरले आहे. केवळ आर्थिक निकष आणि आकडेवारीची प्रमाणबद्धता राखणे एवढाच हेतू न ठेवता, सभासदांचा आत्मसन्मान वाढवणे, त्यांची आर्थिक उन्नती साधणे आणि नवयुवकांना सहकार क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध करून देणे यावर संस्थेने भर दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत काम केल्यामुळेच संस्थेने सहकार जगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सहकार क्षेत्रातील भक्कम आणि एकजिनसी ताकद
सभासदांच्या सदिच्छा, स्नेह आणि विश्वास या अमोघ संगमातूनच स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक मजबूत झाले आहे. ५० हजार सभासदांचा हा एकजिनसी समूह आणि त्यांची आर्थिक ताकद हीच पतसंस्थेची खरी शक्ती आहे. भविष्यातही ही पतसंस्था सहकार क्षेत्रातील आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता कायम राखत अधिक वेगाने प्रगती करेल, असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.













